Uddhav Thackeray : मनसे आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे कोंडीत अडकले ?
मनसे आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे कोंडीत अडकले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने लढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. पण मारहाणीची भाषा करणारे आमच्यासोबत नको, असे म्हणत काँग्रेसकडून मनसेच्या युतीवर फूल स्टॉप दिलाय. दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले आम्ही मविआचा भाग नाही. या दोन्ही पक्षाच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना इकडे आड अन् तिकडे विहिर असे झालेय. कारण, मराठीच्या मुद्दयावर ठाकरे बंधू तब्बल १८ वर्षानंतर एकत्र आले. त्यानंतर प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जाण्याचे सूतोवाच दिले होते. पण आता राज ठाकरेंना मविआ घ्यायचे नाही, असे काँग्रेसकडून सांगण्यात आलेय. उद्धव ठाकरेंना काँग्रेसलाही सोडायचे नाही अन् भावालाही सोबत घ्यायचे आहे
महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला सामील करून घेण्यावरून काँग्रेसने स्पष्ट शब्दात नकार दिला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आघाडी टिकवण्यासाठी आग्रही आहेत. जर राज ठाकरे तुमच्यासोबत असतील तर आम्ही तुमच्यासोबत येणार नाही, असे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. काँग्रेस नेते वर्षा गायकवाड आणि रमेश चेन्निथला यांनी स्वबळाची घोषणा केल्याने ठाकरे गट नाराज झाला आहे. त्यांच्या मते, या घाईच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे नुकसान होऊन महायुतीला फायदा होईल. आघाडीतील ऐक्य टिकावे आणि मतांचे विभाजन टाळावे यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. जागावाटपाची जबाबदारी असलेले नेतेही वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करत आहेत.
विधानसभा निवडणुकीत मविआचे जागावाटप अन् वंचितसोबतच्या युतीच्या चर्चा रखडल्या होत्या. महायुतीकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, पण नविआच्या चर्चा मात्र संपल्या नव्हत्या. याचाच फटका निवडणुकीत बसल्याचे संजय राऊत यांनी मान्य केले होते. आता पुन्हा एकदा मविआकडून तीच चूक होतेय का? असा सवाल उपस्थित झाला आहे. आता उद्धव ठाकरेंना मुंबई आणि उपनगरासाठी राज ठाकरेंची साथ हवी आहे. पण काँग्रेसलाही सोडायचे नाही. तर दुसरीकडे काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत जायला तयार आहे, पण त्याना राज ठाकरेंची साथ नको आहे. आशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे कात्रीत अडकले आहेत. महिन्याच्या आत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा होईल. पण अद्याप महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट झालेले नाही.
