मच्छी पकडायला गेलेल्या इसम वाघाच्या हल्ल्यात ठार
भूपेश बारंगे | वर्धा : वर्ध्यातील आष्टी तालुक्यातील येणाडा (पिलापूर) येथील सुबरावमहादेव बासकवरे वय 45 तीन दिवसांपूर्वी तलावात मासेमारी करण्यासाठी गेले असता घरी परत आले नाही. तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू असताना आज सकाळच्या सुमारास मौजा पिलापूर संरक्षित वन कक्ष क्रमांक 119 मधील जंगलात इसमाचा शरीराचे छिन्नविच्छिन्न वेगवेगळे भाग आढळून आले. यावरून वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज नागरिकांनी केला आहे. यावेळी ही माहिती आष्टी वनविभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी योगानंद उईके, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळावर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ पाच लाखाचा धनादेश देण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
मासेमारीसाठी गेला अन वाघाच्या हल्ल्यात ठार झाला
घरची परिस्थिती जेमतेम यात मासेमारी करून मिळेल त्या पैशात कुटुंबाचा गाडा चालवत असायचे,यात तीन दिवसांपूर्वी मच्छिमार करण्यासाठी पिलापूर जवळील तलावात गेला अन घनदाट जंगलात त्याच्यावर वाघाने हल्ला केला यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तीन दिवसांनी उघडकीस आली. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचा कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे वनविभागने तात्काळ मदत देऊन कुटुंबांना सावरण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.