Israeli Attacks On Gaza : गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यांचा कहर, गाझामध्ये 146 जण ठार तर 400 हून अधिक लोक जखमी
मार्चमध्ये युद्धबंदी मोडल्यानंतर गुरुवारपासून इस्रायलने गेल्या 24 तासांमध्ये गाझावरील हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत. या केलेल्या हल्ल्यांमध्ये 146 नागरिकांचा मृत्यू झाला तर तब्बल 459 जण जखमी झाल्याची माहिती तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाझा पट्टीत मध्यरात्रीपासून 58 हून अधिक जणांचा मृतदेह सापडला असून मृतांच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची माहिती आहे.
इस्रायली लष्कराने उत्तरेकडील बेत लाहिया शहर आणि जबालिया निर्वासित छावणीवर केलेल्या हल्ल्यानंतर गाझाच्या नागरिकांना तत्काळ दक्षिणेकडे जाण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांनी खान युनूस शहराकडे जाण्याचा मार्ग निवडला. यादरम्यान हमासला पराभूत करुन तसेच ओलिसांची सुटका करण्याच्या उद्देशातून इस्रायलने 'ऑपरेशन गिडॉन वॅगन्स' सुरु केले असल्याची माहिती दिली आहे.
उत्तर गाझा येथील इंडोनेशियन रुग्णालयाचे संचालक मारवान अल सुल्तान यांनी सांगितलं की, मागील 19 महिन्यांच्या युद्धादरम्यान इस्रायल सैन्याने केलेल्या हल्ल्यामध्ये गाझामधील रुग्णालयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मार्चमध्ये झालेल्या नाकेबंदीदरम्यान वैद्याकीय सामग्रीपुरवठा बाधित झाला आहे असं देखील तेथील संचालकांनी सांगितले आहे.