SpaDex Mission: इस्त्रो पुन्हा एकदा मोठी भरारी घेण्यासाठी सज्ज, स्पेस डॉकिंग क्षेत्रात महत्त्वाचं पाऊल
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतराळ क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी भरारी घेण्याच्या प्रतिक्षेत आहे. इस्त्रोच्या मिशनमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची शान पुन्हा एकदा वाढणार आहे. चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर भारतासह जगातील शास्त्रज्ञांच्या इस्त्रोकडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत. येत्या ३० डिसेंबर रोजी भारत असा प्रयोग करणार आहे जो प्रयोग आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीनला यश आलं आहे. त्यानंतर अंतराळ क्षेत्रात हा प्रयोग करणारा भारत हा चौथा देश असणार आहे. इस्त्रोच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचं नाव स्पेडेक्स मिशन असं आहे.
काय आहे स्पेडेक्स मिशन?
भारताचा बहुप्रतिक्षित महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला स्पेश स्टेशन म्हणजेच (भारतीय अंतरिक्ष स्टेशन) च्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे. ISRO चे SpaDeX मिशन अंतर्गत PSLV-C60 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामार्फत अंतराळात दोन लहान अंतराळयानांच्या डॉकिंगचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी, भारतीय अंतरीक्ष स्टेशन (BAS) बांधण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं ठरणार आहे. स्पेस डॉकिंग क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या एलिट क्लबमध्ये सामील होण्याचं भारताचे ध्येय असल्याचं इस्त्रोने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
डॉकिंगची प्रक्रिया कशी असणार आहे?
स्पेडेक्स मिशन अंतर्गत PSLV-C60 रॉकेटचे विशेष डिझाईन करण्यात आलं आहे. यामार्फत दोन्ही उपग्रहांना अंतराळात नेलं जाणार आहे. जे साधारण प्रत्येकी २२० किलो वजनाचे असतील. पृथ्वीच्या वर ४७० किमी अंतरावर या दोन्ही उपग्रहांचा डॉकिंग आणि अनडॉकिंगचा प्रयोग करण्यात येईल. ६६ दिवसांच्या टाईमफ्रेममध्ये हे प्रयोग करण्यात येणार आहेत.
इस्त्रो 'भारतीय डॉकिंग सिस्टम' या विशेश पद्धतीने डिझाईन करण्यात आलेल्या अंतराळ डॉकिंग तंत्राचा वापर करणार आहे. जे तंत्रज्ञान NASA ने विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय डॉकिंग सिस्टम (IDSS) च्या मानकांच्या अटी पूर्ण करतं. डॉकिंग करण्यात येणारे उपग्रह साधारण ताशी 28,800 किलोमीटर वेगाने परिक्रमण करतील. हा वेग म्हणजे कोणत्याही व्यावसायिक विमानांच्या वेगापेक्षा ३६ पट अधिक आहे. विशेष पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले रॉकेट आणि सेंसरच्या एक सेटचा वापर करून उपग्रहांच्या सापेक्ष गतीला साधरण शून्य किंवा ताशी 0.036 किलोमीटर किंवा 10 मिलीमीटर प्रति सेकंदपर्यंत मंदावण्यात येईल. त्यानंतर या दोन्ही उपग्रहांना एकत्र जोडण्यात येईल. महत्त्वाची बाब म्हणजे इस्त्रोने भारतीय डॉकिंग तंत्रज्ञानाचे पेटेंट मिळवलं आहे.
स्पेडेक्स मिशनसाठी इस्त्रो सज्ज आहे. स्पेडेक्स मिशनमधील उपग्रह PSLV-C60 रॉकेटला जोडण्यात आले आहेत. आता हे भरारी घेण्यासाठी सज्ज असल्याची पोस्ट इस्त्रोने शेअर केली आहे.