Iran-Israel War : 10 दिवसांच्या संघर्षात कोणता देश ठरला अधिक नुकसानग्रस्त? जाणून घ्या...
13 जून 2025 रोजी इस्त्रायलने ‘ऑपरेशन राइजिंग लायन’ या नावाने इराणविरुद्ध मोठं लष्करी अभियान सुरू केलं. 22 जूनपर्यंत या संघर्षाला 10 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले, मात्र नुकसानाच्या बाबतीत इराणची स्थिती अधिक गंभीर आहे. या संघर्षाच्या सुरुवातीला इस्त्रायलने आक्रमक भूमिका घेत इराणमधील अनेक संवेदनशील अणुठिकाण्यांवर निशाणा साधला.
नतांज, इस्फहान आणि अराक येथील प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आले. अहवालांनुसार, या हल्ल्यांत शेकडो सैनिक, अणुविज्ञानज्ञ व रिव्होल्युशनरी गार्ड अधिकारी ठार झाले. याशिवाय, अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून काही भागांत किरणोत्सर्ग झाल्याचंही समोर आलं आहे. यामुळे इराणचं क्षेपणास्त्र नियंत्रण आणि कमांड सिस्टीम मोठ्या प्रमाणात अकार्यक्षम झाली आहे.
दुसरीकडे, इराणने प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलवर सुमारे 1,000 ड्रोन व 450 क्षेपणास्त्र डागले. इस्त्रायलच्या ‘आयरन डोम’, ‘डेव्हिड्स स्लिंग’ आणि ‘एरो सिस्टम’ या हवाई संरक्षण यंत्रणांनी त्यापैकी बहुतेक निष्प्रभ केल्या. मात्र, काही हल्ले नागरी परिसरात पोहोचले, ज्यामुळे 24 नागरिकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 200 जण जखमी झाले. लष्करी दृष्टिकोनातून मात्र इस्त्रायलला फारसा फटका बसलेला नाही.
या 10 दिवसांच्या संघर्षातून हे स्पष्ट होतं की, इराणला आर्थिक, तांत्रिक व मानवी संसाधनांचं मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. इस्त्रायलचं नुकसान तुलनेत मर्यादित असून ते मुख्यतः नागरी भागापुरतं सीमित आहे. युद्धात तांत्रिक प्रगती आणि मजबूत संरक्षण यंत्रणांचा प्रभाव निर्णायक ठरत असल्याचा हा स्पष्ट इशारा आहे.