Pune : काचेच्या तुकड्यानंतर आता भुर्जीमध्ये सापडलं झुरळ! पुण्यातील गुडलक कॅफे पुन्हा वादात

Pune : काचेच्या तुकड्यानंतर आता भुर्जीमध्ये सापडलं झुरळ! पुण्यातील गुडलक कॅफे पुन्हा वादात

पुणे–मुंबई हायवेवरील गुडलक कॅफेमध्ये अंडा भुर्जीमध्ये झुरळ असल्याचा दावा करत एका ग्राहकाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे–मुंबई हायवेवरील गुडलक कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावेळी एका ग्राहकाने आपल्या ऑर्डरमध्ये अंडा भुर्जी घेतल्यानंतर त्यामध्ये झुरळ असल्याचा दावा करत फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ग्राहकाने बिलदेखील सार्वजनिक केल्यामुळे प्रकरणाला अधिकच वळण लागलं आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, अनेक नागरिकांनी कॅफेच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काच सापडल्याची तक्रार झाली होती. त्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तिथल्या शाखेचा परवाना तात्पुरता रद्द करत ती शाखा बंद करण्याचे आदेश दिले होते. स्वच्छतेच्या बाबतीत गुडलक कॅफेकडून मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत स्पष्ट झाले आहे. या तपासणीत कॅफेमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे नसल्याचे आढळले, तसेच स्वयंपाकघरातील टाईल्स तुटलेल्या होत्या.

काही ठिकाणी पाणी साचलेले होते, फ्रिजमधील स्वच्छतेची अवस्था अत्यंत खराब होती आणि स्वयंपाकघरात तसेच कॅफेच्या बाहेरील भागात उघड्या कचरापेट्या आढळून आल्या. या त्रुटींमुळे संबंधित शाखा तात्पुरती बंद करण्यात आली असून, सुधारणा केल्यानंतरच पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. 1935 साली सुरू झालेलं हे पारंपरिक इराणी कॅफे, अनेक पिढ्यांपासून पुणेकरांमध्ये लोकप्रिय आहे. खास करून बन मस्का, खिमा पाव आणि कॅरेमल पुडिंगसाठी हे ठिकाण तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मात्र सतत होणाऱ्या अन्नविषयक तक्रारींमुळे आता त्यांच्या ब्रँडवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com