Maharashtra Politics : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का! बडा नेता भाजपमध्ये
(Maharashtra Politics) राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हे उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यातील राजकारणात या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली असून, ठाकरे गटाला हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुभाष भोईर भाजपात दाखल होणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर होत असलेला हा पक्षप्रवेश केवळ स्थानिक नव्हे, तर राज्यपातळीवरील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारा ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
सुभाष भोईर यांचा राजकीय प्रवास पाहता, त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यावेळी ते शिवसेनेतील प्रभावी चेहरा मानले जात होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर राजकीयदृष्ट्या काहीसे दूर असलेले भोईर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सक्रिय झाले. यावेळी त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती.
या निवडणुकीत सुभाष भोईर यांचा सामना शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्याशी झाला. मात्र या लढतीत भोईर यांचा पराभव झाला. निवडणुकीनंतर ठाकरे गटाकडून त्यांना लोकसभा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र काही कालावधीनंतर हे पदही त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं. यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी वाढल्याचं बोललं जात होतं.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशानंतर महाविकास आघाडीला सातत्याने गळती लागल्याचं चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते व पदाधिकारी महायुतीकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असून, याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या पक्षांतराच्या लाटेत आता ठाण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातून माजी आमदाराचा भाजप प्रवेश ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. निवडणुकांच्या तोंडावर नेतृत्वावर असलेला विश्वास, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवणं हे ठाकरे गटासमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे.
एकीकडे महायुती आपली ताकद वाढवत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीला लागलेली ही गळती थांबवण्यासाठी कोणती रणनीती आखली जाणार, याकडे आता संपूर्ण राजकीय महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सुभाष भोईर यांच्या भाजप प्रवेशामुळे येत्या महापालिका निवडणुकांच्या राजकारणाला नवं वळण मिळणार, हे मात्र निश्चित आहे.
थोडक्यात
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड
ठाकरे गटाला आणखी एक धक्का
माजी आमदार सुभाष भोईर भाजपमध्ये प्रवेश करणार
उद्या भाजप प्रवेशाची खात्रीशीर माहिती
ठाणे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ

