Pandharpur News : पंढरपुरात चाललंय तरी काय? 'तीर्थ' म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री
आषाढी एकादशीच्या यात्रेनंतर पंढरपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रभागा नदीचं पाणी, जे श्रद्धेनं तीर्थ म्हणून घेतलं जातं, तेच आता थेट विक्रीसाठी वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे. बीव्हीजी या खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनीच हा गोरखधंदा केल्याचा आरोप आहे.
याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये भाविकांकडून पैसे घेऊन नदीचं पाणी देताना संबंधित कर्मचारी दिसत आहेत. या काळात चंद्रभागा नदीला पूराचा इशारा असल्यामुळे महाद्वार घाटावरून थेट नदीत उतरण्यास बंदी होती. भाविकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि बीव्हीजी कंपनीचे सुरक्षारक्षक तैनात होते.
मात्र, याच सुरक्षारक्षकांनी नदीचं पाणी पैसे घेऊन भाविकांना वितरित केल्याचं समोर आलं. भाविकांमध्ये या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली असून, मंदिर प्रशासनाची भूमिकाही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे आता प्रशासनाकडून या सुरक्षारक्षकांवर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.