Vladimir Putin and Narendra Modi ट्रम्प यांना चिमटा! पुतिन-मोदी यांचं समीकरण घडवतंय नवा राजकीय खेळ?
जगभरात रशिया–युक्रेन युद्ध आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी झालेल्या अलास्का बैठकीची चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक मोठी घटना घडली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट फोन कॉल करून चर्चा केल्याचे समोर आले आहे. खुद्द पुतिन यांनी मोदींना संपर्क साधल्यामुळे या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये झालेल्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धबंदी व्हावी यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या चर्चेतून युद्धबंदी करार झाला, तर अमेरिकेने भारतावर वाढवलेले आयातशुल्क कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ही बैठक कोणत्याही ठोस कराराशिवाय संपली. फक्त सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.
या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी थेट मोदींना कॉल करून संवाद साधला. या चर्चेबाबतची माहिती स्वतः नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ (पूर्वी ट्विटर) या सोशल मीडियावरून दिली. पुतिन माझे मित्र असून आमची रशिया–युक्रेन परिस्थितीवर चर्चा झाली, असे मोदींनी ट्विटमध्ये नमूद केले. “भारताने कायमच शांततेच्या मार्गाने वाद सोडवण्याची भूमिका घेतली आहे. युक्रेन संकटाच्या तोडग्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला भारताचा पाठिंबा असेल.
पुढील काळात माझ्या आणि पुतिन यांच्यात सातत्याने संवाद आणि सहकार्य सुरू राहील,” असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. मोदी–पुतिन यांचा हा संवाद केवळ द्विपक्षीय संबंधापुरता मर्यादित नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याचे परिणाम दिसू शकतात. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, यासाठी भारतावर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयामुळे भारताचे मोठे नुकसान होणार असल्याचे संकेत आहेत. तरीदेखील भारत आणि रशियामधील मैत्रीपूर्ण संबंध कायम राहिले आहेत. पुतिन यांनीदेखील भारताशी मैत्रीपूर्ण नाते अधोरेखित करत, अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोदी–पुतिन यांची फोनवर झालेली चर्चा ही ट्रम्पसाठी एक प्रकारचा राजनैतिक धक्का मानली जात आहे.