S. Jaishankar On Donald Trump : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे स्पष्ट विधान; ट्रम्प यांचा दावा पुन्हा फेटाळला
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धसदृश तणाव नुकतेच शमले असून, युद्धविरामाचे श्रेय कोणाला जाते, यावरून मात्र वाद अजूनही कायम आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचे श्रेय स्वतःकडे घेतले होते. मात्र, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेत या दाव्याचा पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतला आहे.
क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले की, “भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी हे दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMO) स्तरावरील चर्चेनंतरच झाला. त्याचे सर्व रेकॉर्ड अत्यंत स्पष्ट आहेत.” त्यामुळे अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा किंवा युद्ध थांबवण्यात भूमिका बजावल्याचा दावा फोल ठरतो, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिला.
एप्रिलच्या अखेरीस पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. तीन दिवस तणावपूर्ण वातावरणानंतर दोन्ही देश युद्धविरामास सहमत झाले.
या युद्धविरामाची घोषणा ट्रम्प यांनी ट्विटरवरून केल्याने जगभर आश्चर्य व्यक्त झाले होते. मात्र, दोन्ही देशांनी हे नाकारत निर्णय स्वतंत्रपणे झाल्याचे स्पष्ट केले होते. ट्रम्प मात्र वारंवार हे यश स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट करत ट्रम्प यांचा दावा पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे.