Jalgaon SSC Exam | रिक्षात बसून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी केली कॉपी तयार, जळगावातील प्रकार

जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव येथे दहावीच्या मराठी पेपरच्या वेळी रिक्षात बसून कॉपी तयार करणाऱ्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ.
Published by :
shweta walge

जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर सुरु असताना विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी केंद्राबाहेर एका रिक्षात बसून कॉपी तयार करणाऱ्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी फिर्याद दिली आहे.

किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय केंद्रावर सकाळी इयत्ता दहावीचा मराठी द्वितीय व तृतीय विषयाचा पेपर असताना एका ऑटो रिक्षात सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शिला तायडे व तेथील शिक्षक अमोल भालेराव व त्यांच्यासोबत आशा पटेल असे तिघेजण कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने अपेक्षित प्रश्नसंचातून प्रश्नोत्तरे पाहून कॉपी बनवत होते. याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला झाला आहे. त्यानुसार यावल पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिका शिला तायडे, शिक्षक अमोल भालेराव, आशा युसूफ पटेल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित शिक्षकांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका कशी आली?, प्रश्नपत्रिका आणखी इतर कुणाच्या मोबाईलवर पाठविण्यात आली होती का?, या प्रकरणात संस्थेचा काही संबंध आहे का? या सर्व बाबींचा यावल पोलीस तपास करणार आहेत. तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com