Nitesh Rane On Manoj Jarange : जरांगे चिचुंद्री म्हणाले, "पण मी हिंदुत्वाचं काम करत राहीन"
मराठा आरक्षण आंदोलनावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून रोज नवे नेते तिथे भेट देत आहेत. आंदोलनामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही उधाण आले आहे. मनोज जरांगे पाटलांनी मंत्री नितेश राणेंवर टीका केली होती. त्यांनी राणेंच्या आवाजाची तुलना चिचुंद्रीशी केली होती. यावर आता नितेश राणेंनी पलटवार केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारने समिती केली आहे. त्या समितीत मातब्बर लोक आहेत. त्यामुळे या प्रश्नावर लवकर तोडगा निघेल. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं. ते कोणी घालवलं, हा प्रश्न विचारायलाच हवा. “फडणवीस साहेबाचं नाव घेतल्याशिवाय हे पुढे जाऊच शकत नाही. ज्या झाडाला फळं लागतात, त्याच झाडावर दगड मारले जातात,” असंही राणे म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना राणे म्हणाले की, “आता ते मला शिव्या देणारच. कारण कालपासून त्यांना दाढीवाले भेटत आहेत. त्यांना खुश करायचं आहे, म्हणून ते मला लक्ष्य करत आहेत. मी हिंदुत्वाचं काम करतो, त्यामुळे मला शिव्या दिल्या जातात. पण यातून मी मागे हटणार नाही.”
आंदोलनाच्या ठिकाणी काही महिला पत्रकारांची छेडछाड झाल्याच्या आरोपावरही नितेश राणे बोलले. ते म्हणाले, “आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. मग महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणं हे कधीच होणार नाही. हे नेमकं कोणी केलं ते शोधायला हवं.”
आंदोलनस्थळी गेलेल्या सुप्रिया सुळे यांच्यावरही त्यांनी टीका केली. राणे म्हणाले की, “त्या तिथे का गेल्या? त्यांनी फडणवीस साहेबांचं नाव घेतलं पाहिजे. आरक्षण दिलं ते त्यांनीच. आणि नंतर ते कोणी घालवलं, हा प्रश्नही लोकांनी विचारला पाहिजे.”
आझाद मैदानावर एमआयएमचे वारिस पठाण आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी गेले होते. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “जिहादी मानसिकतेचे लोक जर व्यासपीठावर बसणार असतील, तर हे चुकीचं आहे. अशा व्यासपीठावर गोमूत्र शिंपडलं पाहिजे.”
पोलिस आंदोलकांच्या वेशात येत आहेत, या मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरही राणे म्हणाले की, “पोलिसांवर एवढा अविश्वास दाखवू नका. त्यांनी सुट्टी रद्द करून काम सुरू ठेवलं आहे. ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणं योग्य नाही.”
शेवटी कोकणातील परिस्थितीबाबत बोलताना राणे म्हणाले, “कोकणात मराठा समाजाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सगळे इथे गुण्या गोविंदाने राहतो. इथे कुठलाही वाद नाही. कोकणातले समाज परस्परात शांततेने राहत आहेत.”
नितेश राणे यांनी स्पष्ट केलं की ते हिंदुत्वाचं काम करत राहतील. विरोधक टीका करत असले तरी ते मागे हटणार नाहीत. जरांगे पाटलांनी केलेल्या चिचुंद्रीसारख्या आवाजाच्या टीकेलाही त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आपल्या भाषणातून आंदोलनावर, विरोधकांवर आणि काही नेत्यांवर टीका केली.