जायकवाडी धरणाची पाणी पातळी 60 टक्केवर; धरणात 97 हजार क्यूसेक वेगाने पाण्याची आवक
सुरेश वायभट | पैठण: नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात होत असलेला पावसामुळे गोदावरी नदीला पुर आला असून पुराचे पाणी मोठ्या वेगाने पैठण येथील जायकवाडी धरणात दाखल होत आहे. सध्या जायकवाडी धरणात 97 हजार 468 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
धरणाची पाणी पातळी 60 टक्क्यांवर गेल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे. जायकवाडी धरणात 70.30 टिमसी पाणी साठा झाला असुन जिवंत पाणीसाठा हा 44.23 इतका झाला आहे. नाशिक, नगर जिल्ह्यांत दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. हे पाणी 'जायकवाडी'च्या दिशेने झेपावत आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी मोठी वाढ होणार असल्याचा आदांज व्यक्त केला जात आहे.
धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता विजय काकडे हे वाढत्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहे.पावसाळ्याच्या तिसऱ्या महिन्यात का होईना, 'जायकवाडी' धरण निम्म्याहून अधिक भरल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.