Jayant Patil : ही लढाई सोपी नव्हती, गेल्या एक वर्षात बरीच उलथापालथ झाली

Jayant Patil : ही लढाई सोपी नव्हती, गेल्या एक वर्षात बरीच उलथापालथ झाली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉल या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करणार आहेत तर 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अहमदनगरच्या न्यू आर्टस कॉलेजच्या मैदानावर वर्धापन दिन साजरा करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी ट्विट केलं आहे. जयंत पाटील म्हणाले की, आज आपण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्यमहोत्सवी उत्सव साजरा करत आहोत. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या आठ खासदारांनी लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश मिळवला आहे, त्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे. ही लढाई सोपी नव्हती. गेल्या एक वर्षात बरीच उलथापालथ झाली. स्वार्थापोटी अनेकांनी आपल्या पक्षाची साथ सोडली. लोकशाहीच्या मूल्यांनी रुजवलेल्या आपल्या पक्षाचे चिन्ह पळवले. शाब्दिक चिखलफेक केली गेली. मात्र पुरोगामी विचारांनी फुललेला आपला वटवृक्ष डगमगला नाही. तो आपल्यासारख्या निष्ठावंतांच्या साथीने अधिक बहरला. लोकांनी निस्सीम विश्वास ठेवत आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांना बळ दिले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण विजयश्री मिळवला. आता संसदेत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक या सर्वांच्या प्रश्नांवर जाब विचारला जाईल. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला प्रत्येक खासदार आवाज उठवेल हा आम्हाला विश्वास आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आपल्याला इथेच थांबायचे नाही तर जात, धर्म, पंथ, प्रांत बाजूला सारून महाराष्ट्र धर्म वाचविण्यासाठी लढायचे आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वैचारिक वारसा आपल्याला अविरतपणे वाहायचा आहे. घरोघरी पुरोगामी विचार रुजावेत यासाठी प्रयत्न करायचा आहे. येणाऱ्या काळात आदरणीय पवार साहेब, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि मी स्वतः राज्यभर फिरून लोकांशी संवाद साधणार आहे. अडल्यानडल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी पक्ष म्हणून तुम्ही स्वतःकडे घ्या. आपला पक्ष, चिन्ह लोकांच्या मनात कोरले गेले पाहिजे. यासाठी आपल्याला अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. पक्षाच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त समाजाशी बांधिलकी जपत, महाराष्ट्राच्या हितासाठी झटण्याची प्रतिज्ञा करूयात. असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com