Jayant Patil : संसदेत महाराष्ट्राचा आवाज आता बुलंद होणार आहे

Jayant Patil : संसदेत महाराष्ट्राचा आवाज आता बुलंद होणार आहे

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्र धर्माच्या लढाईत जनतेने निवडणूक हातात घेतल्याने आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कडवी झुंज दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला मात्र काही ठिकाणी आपल्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला आहे. मात्र त्यांनी दिलेल्या लढ्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पक्षाप्रती त्यांचे समर्पण, जनतेप्रती असलेली त्यांची बांधिलकी त्यांना भविष्यात नक्कीच यश मिळवून देईल हा मला विश्वास आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून मा. सुप्रियाताई सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे, माढा लोकसभा मतदारसंघातून मा. धैर्यशील मोहिते पाटील, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मा. भास्कर भगरे, बीड लोकसभा मतदारसंघातून मा. बजरंग बाप्पा सोनवणे, वर्धा लोकसभा मतदारसंघातून मा. अमर काळे, अहमदनगर (अहिल्यानगर) लोकसभा मतदारसंघातून मा. निलेश लंके, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मा. बाळ्या मामा म्हात्रे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिलेदारांनी जनतेचा विश्वास संपादित करत लोकसभा निवडणुकीत विजयाची मोहोर उमटवली आहे. त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आघाडीतील घटक पक्षातील सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, बीड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी विरोधकांकडून बूथ कॅप्चरिंगचे प्रकार झाले. त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार देखील केली. काल मतमोजणीच्या दिवशीही प्रचंड गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सत्याला कल मिळाला. सातारा लोकसभा मतदारसंघातून लढणारे मा. शशिकांत शिंदे तसेच रावेर मतदारसंघातून लढणारे मा. श्रीराम पाटील यांची लढत अटीतटीची झाली. त्यांच्या निसटता पराभवामुळे दुःख झाले असले तरी आमच्या या नेत्यांच्या कार्यकर्तृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संसदेत महाराष्ट्राचा आवाज आता बुलंद होणार आहे. शेतकरी कष्टकरी महिलावर्ग यांना खऱ्या अर्थाने सन्मान मिळावा यासाठी आमचे खासदार सदैव प्रयत्नशील राहतील. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी ते झटतील. लोकशाहीचा आवाज बुलंद करतील हा मला विश्वास आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com