Spy YouTuber Jyoti Malhotra Probe : दानिशच्या सांगण्यावरून पाकिस्तानचे दौरे, 2 गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट; पोलीस चौकशीत ज्योती मल्होत्रा एक्सपोज
हरियाणामधील पोलिसांनी अलीकडेच ज्योती मल्होत्रा या तरुण युट्यूबरला अटक केली असून, तिच्याकडून सध्या सखोल चौकशी सुरु आहे. ती पाकिस्तानसाठी हेरगिरीच काम करत असल्याचा गंभीर आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. प्राथमिक तपासामध्ये असे समोर आले आहे की तिने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांशी संबंध ठेवून भारतीय लष्करासंबंधित गोपनीय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. तिच्या ब्लॉगिंग संदर्भातील प्रवास, विशेषतः भारताबाहेरील दौरे आणि पाकिस्तानातील संपर्क यावर तपास यंत्रणांचा भर आहे. ज्योतीने दोन वेळा पाकिस्तानचा दौरा केल्याचं स्पष्ट झालं असून, त्या दौऱ्यांदरम्यान तिची ओळख पाकिस्तानी नागरिक अली हसनशी झाली होती. अली हसनच्याच मदतीने तिला तिथल्या सुरक्षायंत्रणा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतीने चौकशीदरम्यान कबूल केलं आहे की ती पाकिस्तानात ब्लॉगिंगच्या निमित्ताने गेली होती. पाकिस्तान उच्चायुक्तालयात दानिश नावाच्या अधिकाऱ्याशी तिची भेट झाली होती. त्याच्याशी तिचा सतत संपर्क सुरु राहिला. त्याच दानिशच्या सांगण्यावरूनच तिने दोनवेळा पाकिस्तानचा दौरा केला. तिथे अली हसनने तिचं राहणं-जेवण आणि फिरण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती. पाकिस्तान दौऱ्यादरम्यान तिने या दोन गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. शकिर आणि राणा शाहबाज यांनासुद्धा ती भेटली आहे.
यातील शकिरचा नंबर तिने ‘जट रंधावा’ या नावाने सेव्ह केला होता. भारतात परत आल्यानंतरही ती WhatsApp, Snapchat आणि Telegram च्या माध्यमातून या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. दिल्लीमध्ये तिने दानिशची वारंवार भेट घेतल्याचंही तिने मान्य केलं आहे. इतकंच नव्हे, तर देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याची कबुलीही तिने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी आहे. लवकर पैसे कमावून ऐषारामी जीवन जगण्याची तीव्र इच्छा तिला होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने विविध ठिकाणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं. सतत नोकऱ्या बदलत राहण्याचा प्रवास तिला हव्या असलेल्या यशापासून दूर नेत गेला. आयुष्यात स्थैर्य न मिळाल्यानं ती अस्वस्थ होती. मागील दोन वर्षांपूर्वी तिने ‘Travel with Jo’ नावाचं युट्यूब चॅनल सुरू केलं. हाच डिजिटल प्लॅटफॉर्म तिच्या देशविरोधी कारवायांचा मार्ग बनला.