Kalidas Sanskrit : कालिदास विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी आणि पत्नीचा अपघातात मृत्यू
kalidas sanskrit university vice chancellor hreram tripathi dies in road accident wife also killed : कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचा शनिवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील मऊ परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. त्रिपाठी हे कुटुंबासह आपल्या मूळ गावी जात होते. ते काल (शुक्रवारी) संध्याकाळी सहा वाजता रामटेक येथून निघाले होते. शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास कुशीनगरजवळ अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच विद्यापीठ परिसरात शोककळा पसरली.
संस्कृत वाङ्मय क्षेत्रातील महत्त्वाचे नाव
प्रा. हरेराम त्रिपाठी हे संस्कृत साहित्यातील मोठे विद्वान आणि साहित्यिक म्हणून ओळखले जात होते. कालिदास संस्कृत विद्यापीठात त्यांनी अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले. नागपूरमध्ये विद्यापीठाच्या विस्तारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योजना आखल्या होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हे प्रयत्न अर्धवट राहिले आहेत.
शैक्षणिक प्रवास
प्रा. त्रिपाठी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील देवरिया (कुशीनगर) येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी 1986 मध्ये बनारस गाठले. रामाचार्य संस्कृत विद्यापीठातून उत्तर माध्यम परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून शास्त्री, आचार्य आणि पीएचडीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
न्यायशास्त्रातील प्रख्यात विद्वान प्रा. वशिष्ठ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी मिळवली. 1993 मध्ये राष्ट्रीय संस्कृत संस्थान (रणवीर कॅम्प, जम्मू) येथे संशोधन सहाय्यक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात त्यांची तत्त्वज्ञान विभागात नियुक्ती झाली. 2009 मध्ये ते सर्वदर्शन विभागाचे प्राध्यापक झाले.
लेखन आणि सन्मान
संस्कृत साहित्य व तत्त्वज्ञान क्षेत्रात त्यांनी 30 हून अधिक ग्रंथांचे लेखन आणि संपादन केले आहे. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2003 मध्ये उत्तर प्रदेश संस्कृत संस्थेकडून महर्षी बद्रायन राष्ट्रपती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. याशिवाय शंकर वेदांत, पाणिनी आणि इतर संशोधन क्षेत्रातीलही अनेक सन्मान त्यांना मिळाले आहे.