कल्याण पूर्वेत शिवसेना ठाकरे गटाचे बॅनर काढल्याने शिवसैनिक आक्रमक

कल्याण पूर्वेत शिवसेना ठाकरे गटाचे बॅनर काढल्याने शिवसैनिक आक्रमक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे बॅनर काढल्याने कल्याण पूर्वेत शिवसैनिक संतप्त झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

कल्याण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे बॅनर काढल्याने कल्याण पूर्वेत शिवसैनिक संतप्त झाले असून या संतप्त शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयात जाऊन ठिय्या मांडला.

कल्याण पूर्वेत इतर गणेशोत्सव, दहीहंडी, वाढदिवसाचे बॅनर सर्रास लागले असून त्यांच्यावर कारवाई न करता केवळ राजकीय दबावाखाली ठाकरे गटाच्या बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्यावरच कारवाई का ? असा सवाल उपस्थित करत इतर बॅनरवर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.

कल्याण पूर्वेत विविध ठिकाणी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाना सुरुवात झाली आणि त्यांना मिरच्या झोंबल्या असून कल्याण पूर्वेतील तुरळक ठिकाणीच या कार्यक्रमाचे बॅनर लावले होते. परंतु काही राजकीय दबावाखाली पालिका प्रशासनाने फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच बॅनर काढले असून इतर पक्षाचे बॅनर, कमानी पूर्ण शहरभर आहेत. परंतु त्यांवर मात्र कारवाई होताना दिसत नाही. फक्त पक्षपातीपणे आमचे बॅनर काढले असून त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो, असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे आणि शहरप्रमुख शरद पाटील यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com