Kapil Sharma: कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांचा जीवाच्या धोक्यावर उपाय
Kapil Sharma: कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांचा जीवाच्या धोक्यावर उपायKapil Sharma: कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांचा जीवाच्या धोक्यावर उपाय

Kapil Sharma: 'त्या' घटनेनंतर कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ

कपिल शर्मा जीवितधोक्यात? मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली; कुख्यात लॉरेन्स गँगचा हात.
Published by :
Team Lokshahi
Published on

Kapil Sharma's life in Danger? : लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा सध्या संभाव्य जीवितधोक्याच्या छायेत आहे. त्याच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’मध्ये महिनाभरात दोनवेळा झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. या हल्ल्यांमागे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

कपिल शर्माने काही महिन्यांपूर्वी कॅनडातील सरे शहरात ‘कॅप्स कॅफे’ सुरू केले होते. मात्र गेल्या काही आठवड्यांत त्याच कॅफेवर दोन वेळा गोळीबार झाला. दुसऱ्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कपिल राहत असलेल्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात त्याच्या सुरक्षेला संभाव्य धोका असल्याचे संकेत मिळाल्याने पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला.

गोळीबारांची जबाबदारी ‘लॉरेन्स बिश्नोई अलायन्स’शी संबंधित गोल्डी ढिल्लॉन, अंकित बंधू शेरेवाला, जितेंद्र गोगी मान ग्रुप, कला राणा, आरजू बिश्नोई, हरी बॉक्सर, शुभम लोणकर आणि साहिल दुहान पेटवाड या आरोपींनी घेतली होती. मात्र कपिलला लक्ष्य का करण्यात आले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

सलमान खानशी जवळीक कारणीभूत?

लॉरेन्स टोळी आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील वैर हे अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबारही झाला होता. गेल्या काही वर्षांत कपिल शर्मा सलमानच्या अगदी जवळचा मित्र व सहकारी बनला आहे. त्यामुळे लॉरेन्स गँगकडून कपिलवर हल्ला करून सलमानच्या इतर जवळच्या सहकाऱ्यांना इशारा देण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी चर्चा आहे.

शीख धर्मावरील टिप्पणी वादाचे कारण?

लॉरेन्स गँग आणि त्याचे अनेक सदस्य पंजाबमधील असल्याने धार्मिक बाबींवरील टिप्पणींविषयी ते विशेष संवेदनशील असतात. अलीकडेच ‘कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा’ शोमध्ये एका स्पर्धकाने शीख धर्मावर विनोदी टिप्पणी केली होती. यानंतर कपिलला सोशल मीडियावर धमक्या मिळू लागल्या. त्यानंतर या टोळीच्या सदस्यांनी केवळ धमकीच दिली नाही तर कॅनडातील कॅफेवर प्रत्यक्ष गोळीबार करून रोष व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर कपिलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असली तरी, या हल्ल्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. मात्र सततच्या धमक्या आणि हल्ल्यांमुळे चाहत्यांमध्येही कपिलच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com