Karnataka Accident : कर्नाटकात मोठी दुर्घटना; गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसला; 8 जणांचा मृत्यू
थोडक्यात
कर्नाटकातील हासन जिल्ह्यात मोठी दुर्घटना
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा अपघात
भरधाव ट्रक विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत शिरला
(Karnataka Accident) कर्नाटकातील हासन जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 25 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री (12 सप्टेंबर) राष्ट्रीय महामार्ग-373 वर ही घटना घडली. गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना एका अनियंत्रित ट्रकने गर्दीत घुसून अनेक भाविकांना चिरडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने एका दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे ट्रक थेट विसर्जन मिरवणुकीत घुसला. अपघातानंतर घटनास्थळी भीषण परिस्थिती निर्माण झाली. मृतांमध्ये पाच गावकरी आणि मोसाले होसाहल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ट्रकने सर्वप्रथम एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर वाहन अनियंत्रित होत लोकांच्या गर्दीत शिरले. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना तातडीने हासन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
या घटनेबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी देखील या अपघाताला दुर्दैवी आणि भयानक म्हटले असून मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रार्थना व्यक्त केली. ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.