Karuna Munde : माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडेंची २० कोटींची ऑफर; करुणा मुंडेंचा सनसनाटी आरोप

मला प्रेमात अडकवून जो माझ्याशी लग्न करेल, त्याला २० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केला.
Published by :
Rashmi Mane

माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या पोटगीच्या मुद्द्यावर शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी करुणा मुंडे यांनी कोर्टात सादर केलेली सर्व कागदपत्रे खोटे असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. दरम्यान, "मला हिरोईनची ऑफर होती. पण मी नवऱ्यासोबतच राहिले. मला प्रेमाच्या जाळ्यात ओडून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी देणार होते," असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. "माझ्या बदनामीचा कट रचला जात आहे. मला विविध मार्गांनी त्रास देण्यात येत आहे," असेही त्यांनी नमूद केले. धनंजय मुंडेंने २७ वर्ष एकत्र राहून मला रस्त्यावर आणल्याचा दावा करताना करुणा यांचे अश्रू अनावर झाले.

करुणा मुंडे म्हणाल्या की, "मोठमोठ्या दिग्दर्शकांनी मला हिरोईनचा रोल ऑफर केला होता. पण त्या सगळ्या ऑफर्स फेटाळून लावत मी संपूर्ण जीवन माझ्या पतीसोबत घालवलं. एक पत्नी म्हणून माझं कर्तव्य निभावलं. पण आज माझ्या बदनामीचा कट रचला जातोय. कधी मला तुरुंगात पाठवलं जातंय, कधी माझ्या घरी गुंड पाठवले जात आहेत, कधी माझ्या घराबाहेर पोलीस उभे करणं. कधी माझ्या मागे माणूस पाठवणं, अशा गोष्टी करुन मला त्रास दिला जात आहे. माझा पती धनंजय मुंडे आणि त्याचे दलाल राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर हे सगळे दलाल लोक, जो मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करेल, त्याला २० कोटी रुपये देणार आहेत," असा खळबळजनक आरोप करुणा मुंडे यांनी केला.

न्यायालयीन सुनावणीनंतर करुणा यांनी माध्यमांसमोर मीच धनंजय मुंडेंची १९९६ पासूनची पहिली बायको असल्याचा दावा केला. "माझ्याकडे पुरावे आहेत. धनंजय मुंडे मला सोबत घेऊन जगभर फिरले आहेत. कारण त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. तुम्ही त्यांचे पासपोर्ट बघा. माझे व्हिसा लावलेले आहेत. आम्ही अनेक देशांमध्ये फिरुन आलो आहोत. राजश्रीच्या कोणत्याच कर्जात धनंजय गँरेंटर नाही. पण माझ्या कर्जात आहे. राजश्रीसोबत धनंजय मुंडेंसोबत जॉईंट अकाऊंट नाही. पण माझ्यासोबत आहे," असे करुणा मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com