ट्रम्प यांनी घोषित केलेले FBI चे नवे संचालक काश पटेल आहेत तरी कोण?
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून दमदार कामगिरी त्यांनी केली. तुलसी गब्बार्ड यांच्याकडे नॅशनल इंटेलिजन्सची जबाबदारी दिल्यानंतर आता पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी प्रशासनात संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत.
काश पटेल हे ट्रम्प यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मालकीच्या सोशल मीडिया साईट ‘ट्रु सोशल’वर म्हटले आहे की, 'मला ही घोषणा करताना अभिमान वाटत आहे की कश्यप ‘काश’ पटेल एफबीआयचे प्रमुख म्हणून काम करतील. काश एक उत्कृष्ट वकील, अमेरिकेला प्राथमिकता देणारे योद्धा आहेत. ज्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि न्यायाने अमेरिकन नागरिकांचे रक्षण केलं'
काश पटेल यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1980 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांचं गुजरातशी विशेष नातं आहे. त्यांचे पालक मूळचे भारतीय आहेत. आई पूर्व आफ्रिकेतील टांझिनिया आणि वडील युगांडामधून स्थलांतरीत होत ते १९७० साली कॅनेडावरून अमेरिकेत आले होते. पटेल यांनी रिचमंड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि नंतर पेस युनिवर्सिटी स्कूल ऑफ लॉ मधून ज्युरिस डॉक्टर म्हणून उपाधि प्राप्त केली आहे.
ट्रम्प यांच्यासोबत याआधीही केलं काम
काश पटेल यांनी 2017 मध्ये ट्रम्प प्रशासनामधील शेवटच्या काही आठवड्यामध्ये कार्यवाहक सुरक्षा मंत्री 'चीफ ऑफ स्टाफ' म्हणून काम केलं आहे. ट्रम्प यांनी सांगितलं, ‘काश यांनी माझ्या पहिल्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केलं. या कालावधीत ते सुरक्षा विभागातील चीफ ऑफ स्टाफ, राष्ट्रीय गुप्तचर संचालकांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदांमध्ये दहशतवादी विरोधी विभागात वरिष्ठ संचालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. काश यांनी ६० हून अधिक ज्युरी ट्रायल्स देखील घेतल्या आहेत.
काश पटेल हे ख्रीस्तोफर व्रे यांची जागा घेणार आहेत. २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनीच व्रे यांची एफबीआयचे संचालक म्हणून १० वर्षांसाठी नियुक्ती केली होती. पटेल हे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असेही ट्रम्प यांनी जाहीर केले.