Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द?

Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द?

यमनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिची फाशीची शिक्षा आता पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. यामागे भारत सरकारच्या तसेच धार्मिक नेत्यांच्या प्रयत्नांची महत्त्वाची भूमिका आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

यमनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिची फाशीची शिक्षा आता पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय भारतासाठी अत्यंत दिलासादायक मानला जात असून, यामागे भारत सरकारच्या तसेच धार्मिक नेत्यांच्या प्रयत्नांची महत्त्वाची भूमिका आहे. भारताचे ग्रँड मुफ्ती कंथापूरम ए पी अबुबकर मुसलियार यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, यमनची राजधानी सना येथे नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत निमिषा प्रिया हिला दिलेली मृत्युदंडाची शिक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 16 जुलै 2025 रोजी तिची फाशी निश्चित झाली होती. मात्र, फाशीच्या आदल्या दिवशी भारतातील ग्रँड मुफ्ती अबुबकर मुसलियार यांनी यमन सरकारकडे विशेष विनंती केली होती. त्यानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

निमिषा प्रिया ही 38 वर्षांची नर्स 2008 मध्ये नोकरीच्या शोधात यमनमध्ये गेली होती. तिने एका यमनी नागरिक तलाल अब्दो महदीसोबत सना शहरात एक वैद्यकीय क्लिनिक सुरू केले. काही काळानंतर महदीने तिच्यावर जबरदस्ती केली, तिचा पासपोर्ट काढून घेतला आणि तिला तिथेच थांबण्यास भाग पाडले. भारतात परतण्यासाठी प्रिया यांनी महदीला बेशुद्ध करून पासपोर्ट परत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, औषधाच्या अधिक डोसमुळे महदीचा मृत्यू झाला आणि तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला.

2018 मध्ये अटक झाल्यानंतर 2020 मध्ये तिला यमनमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. 2024 मध्ये यमनच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि 2025 मध्ये हूती गटाने या निर्णयाला मंजुरी दिली होती. यानंतर अनेक सामाजिक संघटना आणि भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे अखेर ही शिक्षा रद्द करण्यात आली. ही घटना भारतासाठी जागतिक स्तरावर मानवी हक्कांसाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com