मराठवाड्यात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांचा मोठा घोटाळा; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना मोठा गौप्यस्फोट केला.
Published by :
Team Lokshahi

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठवाड्यात विशेषतः सिल्लोड, बीड, परळी, भोकरदन या भागात हजारोंच्या संख्येने बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. किरीट सोमय्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या आयजी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करत, बेकायदेशीर घुसखोरीच्या संदर्भातील पुरावे पोलीस प्रशासनाला सादर केल्याचे सांगितले.

सिल्लोडमध्ये 1,100 बोगस जन्म प्रमाणपत्रांचा खुलासा

किरीट सोमय्यांच्या मते, सिल्लोड येथील एसडीएम लतीफ पठाण यांनी सुमारे 2,500 जन्म प्रमाणपत्रे दिली असून, त्यापैकी तब्बल 1,100 प्रमाणपत्रे बोगस असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. काही प्रकरणांत केवळ आधार कार्डाच्या आधारेच जन्म प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे सांगत याप्रकरणी मंत्रालयात लतीफ पठाण यांची हकालपट्टी करण्याची जोरदार मागणी सोमय्यांनी केली आहे.

महापालिकेतही गंभीर घोटाळा, सिल्लोड येथे 22 हजार कागदपत्रे गायब

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचे प्रकरण असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली, उपविभागीय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या 2,500 अर्जांमध्ये अनेकांकडे आवश्यक कागदपत्रेच नव्हती. इतकेच नव्हे, तर सिल्लोड येथील तब्बल 22 हजार कागदपत्रे गायब असल्याची माहिती सोमय्यांनी दिली असून, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राजकीय सहभागाची शक्यता ?, SIT आणि डिटेक्शन सेंटरची मागणी

या सर्व प्रकारात काही राजकीय नेत्यांचा सहभाग असल्यास कारवाई केली जाणार, असा विश्वास व्यक्त केला. सिल्लोडचे मालेगाव करण्याचे कटकारस्थान हे राजकीय नेत्यांनी केले असून या पाठीमागे राजकीय नेत्यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यांनी मालेगावप्रमाणे राज्यभरात SIT लागू करण्याची आणि डिटेक्शन सेंटर स्थापन करण्याची मागणी केली आहे.

'वोट जिहाद'चा आरोप, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची चेतावणी

सोमय्यांनी 'वोट जिहाद'चा आरोप करत, काही राजकीय नेते आणि त्यांच्या समर्थकांनी आंदोलन करून वोट जिहाद जिवंत ठेवण्यासाठी साथ दिल्याचे सांगितले. बेकायदेशीररित्या राहणाऱ्यांच्या मदतीसाठी जे पुढे येतात, त्यांना देखील कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. किरीट सोमय्या मात्र बेकायदेशीर देशात बनावट पुरावे देऊन राहणाऱ्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com