करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सव सोहळा

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सव सोहळा

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सवाला सुरवात होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सवाला सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवडे यांनी किरणाेत्सव मार्गावरील पाहणी केली. अंबाबाई मंदिराच्या अनेक वैशिष्ट्यांमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून दोनदा होणारा देवीचा किरणोत्सव सोहळा. सूर्याच्या दक्षिणायनातील किरणोत्सव बुधवारपासून सुरू होत असून तो ९, १० व ११ राेजी होत आहे.

 देवीच्या किरणोत्सव सोहळ्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी ते दूर करण्यात आले आहेत. मंदिरात पारंपरिक उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे आकर्षक रोषणाईसह पणत्यांनी मंदिर परिसर उजळून गेला. त्रिपुरारी पौर्णिमेचं औचित्य साधून राजाराम बंधाऱ्यावरही  दीपोत्सव पार पडला. त्यामुळे पणत्यांनी घाट उजळून गेला होता.  जुना तसेच अपूर्ण असलेल्या नवीन पुलावर लेसर किरण अन् रोषणाई  करण्यात आली होती. यावेळी बावड्यासह शहरवासियांनी गर्दी केली होती.  

तीन दिवस हा अलौकिक सोहळा संपन्न होणार आहे. मावळत्या सूर्याची किरणे आजपासून मंदिरात प्रवेश करत पहिल्या दिवशी देवीचे चरणस्पर्श, दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत तर तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावर जातात. वाढत्या शहरिकरणात सुद्धा किरणांचा हा मंदिरातील देवीला होणारा सोनसळी अभिषेक कुतुहलाच विषय आहे. वास्तू आणि खगोल शास्त्राचा हा एक अनोखा नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com