कोकणात अवकाळीने बागायतदार संकटात; जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

कोकणात अवकाळीने बागायतदार संकटात; जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

आंबा काजू पिकांचे नुकसान होण्याची भीती

निसार शेख|रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच मुसळधार अवकाळी पाऊस मध्यरात्रीनंतर सुरू झाला आहे या अवकाळी पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. हवामान बदलाचा फटका बसल्याने आधीच अल्प प्रमाणात असलेला आंबा आता अशातच अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडला आहे. मार्च महिन्यातही असाच पाऊस झाला होता. मात्र आंबा काजू पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शासनाकडून अद्याप कोणताही सर्व्हे सुरू करण्यात आलेला नाही.

रत्नागिरी जिल्हयात अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अल्पप्रमाणात असलेला हातात तोंडाजवळ आलेला आंबा आता हातातून जाण्याची वेळ आंबा काजू बागायतदारावर आली आहे. कोकणात एकदा पाऊस पडल्यानंतर आंब्याला मुंबईसारख्या मोठ्या मार्केटमध्ये दर मिळत नाही. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात झाली होती. हवामान विभागाकडूनही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला होता. सात मे ते तेरा मे या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यावर्षी अंबाबिक अल्प प्रमाणात म्हणजेच १५ ते २० टक्केच आहे तसा अहवाल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून शासनाकडे देण्यात आला आहे. मात्र जे काही पीक हातात येण्याच्या मार्गावर आहे ते मात्र या लहरी हवामानामुळे व पावसामुळे हातून जाण्याची भिती निर्माण झाला आहे. कोकणात आंबा पिकावरती मोठी अर्थव्यवस्था अवलंबून असते मात्र गेले जवळपास बारा तेरा वर्षे अनेक वादळे व लहरी हवामान यामुळे कोकणी बागायतदार दरवर्षीच पुरता आर्थिक अडचणीत सापडत आहे.काही वर्षांपूर्वी आलेल्या फयान वादळाने तर आंबा,नारळ,सुपारीच्या बागाच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्यातच गेले काही वर्ष लहरी बदलते हवामानाचा फटका आंबा,काजू, फणस पिकाला बसू लागला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com