कोल्हापुरात शिक्षण विभागाची अब्रू वेशीवर; इयत्ता चौथीच्या मुलींशी शिक्षकाचे असभ्य वर्तन
सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापुरातील पोर्ले तर्फ ठाणे इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या इयत्ता चौथीच्या मुलींशी शिक्षकानेच असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीला आलाय. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. नामदेव पवार असे या शिक्षकाचे नाव असून तो रजा टाकून पसार झालाय. मुली शाळेला जाण्यास नकार देत असल्याने अधिक चौकशी केली असता हा प्रकार पुढे आला. पालकांनी याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.
तर शालेय समिती आणि ग्रामपंचतीने शिक्षकावर कारवाईची मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. संभाजी ब्रिगेडने याबाबत आज मुख्याध्यापकांना चांगलाच जाब विचारला. शालेय शिक्षण मंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्हातच पाल्यांची अशी अवस्था होत असल्याने त्यांनी संबंधितावर कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी संभाजी ब्रिगेडने केली.
याबाबत ग्रामपंचायतीनेही पोलिसांना कळवले आहे. मात्र अद्यापही संबंधितांवर कारवाई झालेली नाही त्यामुळे पालक घाबरले असून त्यांनी मुलांना शाळेत पाठवायचं का नाही असा सवाल उपस्थित केलाय. याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल करावा अन्यथा सोमवारी एकाही शिक्षकाला शाळेत सोडणार नाही असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. दरम्यान पालक वर्ग ही घाबरून गेला आहे.