Konkan Railway : मेंटेनन्स व्हेईकल्स ते मेडिकल व्हॅन! चाकरमान्यांच्या सेवेसाठी कोकण रेल्वे सज्ज; प्रवाशांसाठी कोणकोणत्या सोयीसुविधा?
यंदा मान्सून नेहमीच्या तुलनेत आधीच दाखल झाल्यानं अनेक यंत्रणांची धावपळ सुरू आहे. अशातच कोकण रेल्वे मात्र चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सज्ज झाली आहे. भारतीय रेल्वेच्या एकूण मार्गातील कोकण रेल्वे हा एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा येथून कोकण रेल्वेची हद्द सुरू होते, ते अगदी गोवा ते कर्नाटक राज्यातील ठोकूर गावापर्यंत रेल्वे स्थानकापर्यंत कोकण रेल्वेची हद्द आहे. कोकणातील सुंदर समुद्रकिनारे, नद्या, डोंगरदऱ्या यांचे दर्शन यामुळे प्रवाशांच्या खास पसंतीचा मार्ग म्हणून देखील या मार्गाची ओळख आहे. मात्र, दरड कोसळणे ही या मार्गावरील मुख्य समस्या आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी आपण सज्ज असल्याचं कोकण रेल्वेनं सांगितले आहे.
मुसळधार पावसामध्ये प्रवाशांना सुरक्षित पोहोचवणं ही कोकण रेल्वेची खरी जबाबदारी आहे. यावर्षी कोकण रेल्वेनं त्या संबंधित उपाययोजना केल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी ही करण्यास सुरुवात झाली आहे. दरडी कोसळणे, पूरस्थिती, वळणावळणाचे घाटमार्ग यांसारख्या नैसर्गिक आव्हानांचा सामना करण्यासाठी यंदा अधिक काटेकोर नियोजन करण्यात आल्याचं कोकण रेल्वेनं म्हटलं आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी खबरदारी
1) कोकण रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, 10 जून 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मान्सून विशेष वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
2) वेळापत्रकानुसार, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या धीम्या वेगाने धावणार असून, या गाड्यांना 40 किमी प्रतितास वेगमर्यादा घाट व टनेल भागात लागू करण्यात आल्याचे कोकण रेल्वेनं म्हटलं आहे.
3) या काळात विशेष खबरदारी म्हणून 650 हून अधिक कर्मचारी व अधिकारी मार्गावर तैनात करण्यात आले आहेत.
4) ज्या भागात दरड कोसळण्याच्या शक्यता आहेत, अशा 9 ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल्स सज्ज ठेवण्यात आली आहेत.
5) सोबतच आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी विशेष वैद्यकीय व्हॅन आणि वेर्णा येथे अपघात निवारण टीम तैनात करण्यात आली आहे.
6) या मार्गावर 10 ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून, कोकण रेल्वे मार्गावरील तीन अती संवेदनशील नदी पुलांवर पूर चेतावणी यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेनं दिली.
7) मान्सून काळात मुसळधार पावसामुळे व्हीजीबिल्टी कमी झाल्यास मोटरमनना 40 किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे आदेश दिले आहेत.
कोकण रेल्वेला गेल्या दशकभरात सुदैवाने मोठे अपघात घडलेले नाहीत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपत्ती व्यवस्थापनाची ठोस आखणी करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर कोणतीही तडजोड न करता प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत कोकण रेल्वेनं आपली तयारी पूर्ण केली आहे. मान्सूनच्या काळात वेळेवर सेवा देण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात आल्याचे यावेळी रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.