ठाकरे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा करून कर्मचाऱ्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग : कुडाळ पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता विनायक चव्हाण यांना कार्यालयात येऊन मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य आनंद उर्फ आना भोगले (रा. वेताळबांबर्डे) यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार फंडातील अंदाजपत्र आत्ताच्या आत्ता द्या तसेच निवजे हरिजनवाडी रस्त्याच्या कामाचे मूल्यांकन वाढीव करा अशी जोरजबरदस्ती अधिकाऱ्यांवर करून त्यांना मारहाण केली तसेच उपअभियंता राजेंद्र कुलांगे यांना कार्यालयात बंद करून ठेवले होते.

याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद कुडाळ पंचायत समितीच्या बांधकाम विभाग उपविभागाचे शाखा अभियंता विनायक चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, उपअभियंता राजेंद्र कुलांगे व आपण दुपारी कुडाळ येथे आल्यानंतर मी माझ्या कुडाळ येथील घरी जेवणासाठी गेलो असता आनंद भोगले यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले की निवजे हरिजनवाडी रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणे या कामाचे वाढीव मूल्यांकन करून दे आणि जोरजोरात ते बोलले तसेच शिवीगाळ केली त्यावेळी त्यांना मी कार्यालयात येतो मग आपण बोलू असे विनायक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान त्या काळामध्ये आनंद भोगले हे कार्यालयात दांडा घेऊन मला शोधत होते तसेच शिवीगाळ करत होते. त्यानंतर त्यांनी उपअभियंता राजेंद्र कुलांगे यांच्या केबिनला कडी घालून त्यांना कोंडून ठेवले होते.

संध्याकाळी कार्यालयात गेल्यावर उपअभियंता राजेंद्र कुलांगे यांनी आपल्या केबिनमध्ये मला बोलावलं असता त्या ठिकाणी आनंद भोगले उपस्थित होते. त्यांनी शिवीगाळ करून हातातील दांडा माझ्या हातावर मारला त्यानंतर तो दांडा काढून घेण्यात आला तसेच यावेळी त्यांनी आमदार फंडातील कडावल येथील रस्त्याचे अंदाजपत्र आत्ताच्या आत्ता द्या नाहीतर केबिनच्या बाहेर तुम्हाला जाऊ देणार नाही असे सांगून जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी माजी सभापती उपसभापती अरविंद परब, माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक यांनी आनंद भोगले यांना केबिनच्या बाहेर घेऊन गेले. हा प्रसंग घडला यावेळी ठेकेदार आनंद जंगले, होडावडा माजी सरपंच अरविंद नाईक, कार्यालयीन कर्मचारी दत्तप्रसाद मिसाळ, जतीन ठाकूर, भूषण शेटये उपस्थित होते. या तक्रारीवरून कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये आनंद उर्फ आना भोगले यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा करून सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com