Kunal Kamra : मिश्कील ट्वीट करत सरकारला डिवचलं
स्टँड-अप काॅमेडियन कुणाल कामरा याने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्याने सरकारविरोधात ट्विट करत सरकारला डिवचले आहे. एखाद्या कलाकाराला हुकुमशाही पद्धतीने कसं मारायचं याचे मुद्दे कुणालने आपल्या ट्विटमध्ये मांडले आहेत. त्याने नमूद केले आहे की, १. कलाकाराला त्याचं काम सुरु होण्याच्या आधीच थांबवण्यास भाग पाडणं, २. कलाकाराला खासगी आणि काॅर्पोरेट कार्यक्रम मिळू नये अशी परिस्थिती निर्माण करणं, ३. मोठे क्लब कार्यक्रमासाठी जागा देण्याची जोखीम पत्करणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण करणं, ४. प्रेक्षकांना समन्स पाठवणं, कलेला क्राईम सीन बनवणं, ५. कलाकाराला त्याचा आत्मा विकायला भाग पाडणं किंवा त्याला पूर्णच शांत करणं, ६. कलाकाराला शांत करण्यासाठी राजकीय शस्त्र वापरणं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यामुळे चर्चेत आलेला कुणाल कामराला लोकांची साथ मिळताना दिसतेय. कुणाल कामराला देश-विदेशातून वाढता पाठिंबा मिळत आहे. कायदेशीर लढ्यासाठी कुणालला जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला असून कोट्यवधींची रक्कम त्याच्या अकांऊटला जमा झाल्याचं समोर आलंय. कुणाल कामराला सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता टेरर फंडिंग झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे राहुल कनाल यांनी केला आहे. या मदतीवर आक्षेप घेत चौकशीची मागणीही केली आहे.