Ladki Bahin Yojana Special Report: 'त्या' लाडक्या बहिणींवर कारवाई होणार?
लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी वळवल्याची चर्चा आहे. त्यावरून सरकारमधील काही मंत्र्यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली, तर दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण असल्याचंगी बोललं जात आहे. असं असताना आता एक नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी नोकर असलेल्या महिलांनी कसे लाटलेत लाडकी बहीण योजनेचे पैसे जाणून घ्या... या स्पेशल रिपोर्टमध्ये
निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने अगदी वाजत गाजत मुख्यमंत्री लाडकी बहीण येजनेची घोषणा केली. त्यानंतर लाडक्या बहिणींनी महायुतीच्या ताटात मतांची ओवाळणी टाकली. त्यामुळे महायुतीच्या कपाळावर सत्तेचा टिळा लागला. मात्र त्यानंतर लाखोंच्या संख्येनं लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. त्यावर विरोधकांनी सरकावर टीकेचे बाण सोडले. मात्र आता याच योजनेत नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरंतर सरकारी नोकरी असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तरीही हजारो सरकारी नोकर असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झाले आहे.
सरकारने योजना सुरू केली तेव्हा फार पडताळणी न करता पैसे वाटले. त्यानंतर अनेक महिला अपात्र ठरल्या. मात्र आता ज्या सरकारी महिलांचे अर्ज पात्र केले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. आधीच लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडल्याचं बोललं जातंय. त्यातच इतर अनेक विभागांचा निधी या योजनेसाठी वळवल्याचाही आरोप होतोय. इतकं सगळं असताना सरकारी कर्मचारी असूनही हजारो महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.