Land Scam : 150 कोटींच्या जमिनीचा तिढा कायम; जमीन मालकाची आली 'ही' पहिली प्रतिक्रिया
खासदार संदीपान भूमरेंच्या ड्रायव्हरला तब्बल 150 कोटी रुपये किमतीची जमीन गिफ्ट केल्याच्या प्रकरणावर आता जमीन मालक मीर मोहम्मद अली खान यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ही जमीन त्यांनी स्वतःच्या मालकीची असून ती सुरक्षित राहावी, या उद्देशाने ती त्यांच्या ड्रायव्हरच्या जावेद शेखच्या नावावर केली आहे.
मीर मोहम्मद अली खान म्हणाले की, "ही जमीन औरंगाबादमधील माझ्या मालकीची आहे. परभणीचे वकील मुजाहिद खान या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे मी ती जमीन जावेद शेखच्या नावावर केली. हा निर्णय मी केवळ जमीन सुरक्षित राहावी म्हणून घेतला."
तसेच त्यांनी सांगितले की, "मुजाहिद खानविरोधात मी पोलीस ठाण्यात आधीच तक्रार दाखल केली आहे. मी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांना विनंती करतो की, या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि मुजाहिद खानविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी."
यासोबतच मीर मोहम्मद अली खान यांनी आणखी एक खळबळजनक दावा करत सांगितले की, त्यांचे ड्रायव्हर जावेद शेख याच्याशी ‘घरगुती संबंध’ होते. या विधानामुळे या प्रकरणाला नव्या चर्चेचं वळण मिळालं आहे.
हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक स्तरावर तसेच सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चेला सुरुवात झाली आहे. एका ड्रायव्हरच्या नावावर इतक्या मोठ्या किमतीची मालमत्ता गिफ्ट केली गेली असून त्यामागे नेमकं कारण काय, यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी आता काय वळण घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.