Ravindra Chavan : प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या जागी रवींद्र चव्हाणांची वर्णी ?

Ravindra Chavan : प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या जागी रवींद्र चव्हाणांची वर्णी ?

रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड, पक्षाची नव्या नेतृत्वाची घोषणा
Published on

महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर माजी मंत्री आणि सध्या पक्षाचे कार्याध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांची निवड निश्चित झाली आहे. पक्षाकडून 1 जुलै रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षीच्या विधान परिषद निवडणुकांनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांची प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रिकामी झाली होती. तेव्हापासून या पदासाठी नवे नेतृत्व ठरवण्याची प्रक्रिया सुरू होती. रवींद्र चव्हाण यांचे नाव सुरुवातीपासूनच या पदासाठी आघाडीवर होते, मात्र त्यांना प्रथम पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निवडीचा स्पष्ट संकेत दिला होता. आता पक्षाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करत चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या निर्णयानुसार केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत 1 जुलै रोजी चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या निवड प्रक्रियेचा अधिकृत कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. 30 जून रोजी भाजपच्या प्रदेश कार्यालयात दुपारी 3 ते 5 या वेळेत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 1 जुलैला संध्याकाळी 5 वाजता प्रदेशाध्यक्षपद आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी दिली आहे. या निवडीनंतर महाराष्ट्र भाजपमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी नव्या जोमाने तयारी सुरू होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com