सिगारेट आणली नाही म्हणून मित्राची हत्या
डोंबिवली : सिगारेट आणली नाही या कारणावरून मित्राने रागाच्या भरात मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ४ तारखेला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील पेंडसेनगर मधील तुषार इमारतीच्या समोर घडली. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शनिवारी रामनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून अटक केली. ही घटना इमारतीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरीश्चंद उर्फ बकुळ रामदास चौधरी (वय ३२, रा. ठाकुर्ली) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुषमा जाधव यांच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुषमा जाधव यांचा भाऊ जयेश जाधव असे मारहाणीत मृत्यू पावलेल्याचे नाव आहे.
जयेश आणि हरीश्चंद हे दोघेही मित्र होते. ४ तारखेला दोघेही दारू पिण्यासाठी भेटले. दारू पिल्यानंतर हरीश्चंद यांनी जयेशला सिगारेट आणण्यास सांगितले. जयेशने मात्र सिगारेट आणण्यास नकार दिला. याचा राग आल्याने हरीश्चंदने जयेशला मारहाण केली. या मारहाणीत जयेशच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
काही वेळाने जयेश घरी गेल्यावर झोपला. मात्र, सकाळी जयेश झोपेतून उठत नसल्याने घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी जयेशला मृत घोषित केले. जयेशची बहीण सुषमा हिने रामनगर पोलीस ठाण्यात हरीश्चंद विरोधात गुन्हा दाखल केला.