नशीब बलवत्तर अन् केळीच्या खोडाने तारले; मृत्यूच्या दारातून लता बाई आल्या परत

नशीब बलवत्तर अन् केळीच्या खोडाने तारले; मृत्यूच्या दारातून लता बाई आल्या परत

60 किमी पाण्याचा प्रवाहात वाहून महिलेचे वाचले प्राण

मंगेश जोशी | जळगाव : म्हणतात ना,"देव तारी त्याला कोण मारी" असाच काहीसा अनुभव हा जळगाव जिल्ह्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील बिबट्याच्या भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी यांची संपूर्ण खान्देशकरांमध्ये चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी या तापी नदीकाठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. चोपडा तालुका म्हटलं म्हणजे पहाडी क्षेत्र आणि त्यातल्या त्यात हिंसक प्राण्यांचा वावर असलेला परिसर. शेतात काम करत असताना चक्क बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे लागलेला असल्याचे लताबाई यांच्या लक्षात आले व बिबट्या आपलीही शिकार करेल या भीतीने त्यांनी नदीच्या दिशेने धाव घेत दुथडी भरून वाहणाऱ्या तापी पात्रात उडी घेतली.

पाण्यात उडी घेतल्याने लताबाई कोळी या पाण्याच्या प्रवाहात वाहत अमळनेर तसेच पाडळसरे धरण ओलांडून थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी तीरावर पोहोचल्या. दुसऱ्या दिवशी नाविकांना केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या त्या जिवंत अवस्थेत आढळून आल्या. लताबाई यांनी आपबीती कथित केल्यानंतर नाविक बांधवांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी लागलीच लताबाई कोळी यांना उपचारासाठी मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पुढील उपचारार्थ दाखल केले.

केळीच्या खोड्याच्या आधाराने काढली रात्र

लताबाई पाण्याच्या प्रवाहात वाहत येताना पाडळसरे धरण ओसंडून वाहत असताना केळीचे खोड हाताला लागल्याने त्याचा आसरा घेत त्यांनी रात्री निम शिवारात काठालगत आसरा घेत पाण्यातच रात्र काढली. नाव चालवणारे शंकर कोळी यांना त्या नजरेस पडले असता त्यांनी निम येथील ग्रामस्थांच्या मदतीने लताबाई यांना बाहेर काढले. मात्र, त्या पूर्णताः मरणासन्न झालेल्या होत्या. त्यांच्यावर मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले. सुमारे 14 ते पंधरा तास पाण्यात केळीच्या खोड्याच्या आधाराने त्यांना जीवनदान मिळाले

Lokshahi
www.lokshahi.com