विकासकामं महाराष्ट्रातीलंच आहेत, कर्नाटक, गुजरात, तेलंगणातील नाहीत : अजित पवार

विकासकामं महाराष्ट्रातीलंच आहेत, कर्नाटक, गुजरात, तेलंगणातील नाहीत : अजित पवार

विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची अजित पवार यांची विधानसभेत मागणी

नागपूर : विधीमंडळातील सदस्यांनी मागणी केलेली, अर्थसंकल्पात दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेली, 'व्हाईट बुक' मध्ये नोंद झालेली विकासकामे केवळ सरकार बदलल्यानं कशी थांबू शकतात. शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील विकासकामे थांबवू कसं शकतं ? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली विकासकामं महाराष्ट्रातील आहेत. कर्नाटक, गुजरात किंवा तेलंगणातील नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने राज्यभरातील विकासकामांवर परिणाम होत असून राज्याचं नुकसान होत आहे. महाराष्ट्र सर्वांचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून, सरकारने विकासकामांवरील स्थगिती उठवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी राज्यातील विकासकामांना दिलेली स्थगिती आणि त्याचा राज्यावर होत असलेल्या दुष्परिणामांचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार पुढे म्हणाले की, सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत. यापूर्वीही राज्यानं अनेक सरकारं बघितली, पण असं कधी झालं नव्हतं. सरकारं येत असतात, सरकारं जात असतात, महाराष्ट्राच्या विकासासाठी, जनतेच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात दोन्ही सभागृहात मंजूर झालेली, व्हाईट बुकमध्ये आलेली विकासकाम थांबलीच कशी ? ही महाराष्ट्रातली कामं आहेत, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणातील काम नाहीत ना... अशी संतप्त विचारणा करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना आज धारेवर धरले.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासाची, सर्वसामान्यांची कामं व्हावीत, विकास व्हावा यासाठी आम्ही सर्व सदस्य काम करत असतो, सभागृहात येत असतो. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात बजेटमध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झालेली, व्हाईट बुकमध्ये आलेली विकासकामं, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर थांबविण्यात आली. ही कामं सुरु व्हावीत म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली. मात्र केवळ विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांची कामं थांबविण्यात आली आहेत. आम्ही मनोहर जोशी यांचं, नारायण राणे यांसह अनेक मुख्यमंत्र्यांची सरकारं बघितली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींचं सरकार सुध्दा बघितलं. या सभागृहात अनेक आमदारांच्या सात सात टर्म झाल्या आहेत. ही कामं महाराष्ट्रातीलच आहेत ना... कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणातील तर नाही ना, असा संतप्त सवाल करुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com