सावधान! बॅंकेत गेल्यावर 'ही' काळजी घ्या, नाहीतर तुमचेही लाखो रुपये बुडतील
रिध्देश हातीम| मुंबई : बँकेत काही कामासाठी गेल्यानंतर आपल्याला अनेक लोक भेटतात जे आपल्याकडून बँकेची स्लिप भरण्यासाठी मदत मागतात. कधीकधी आपल्याला कोण ओळखीचा व्यक्तीही भेटते मात्र जर त्याच ओळखीच्या व्यक्तीने आपली फसवणूक केली तर... अशीच एक घटना मालाड परिसरात घडली. यात आरोपीने एका व्यक्तीला आपली ओळख पटवून त्याचा विश्वास जिंकला व त्याची फसवणूक केली आणि त्याचे 98 हजार घेऊन फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा बँकेत पैसे भरण्याकरता गेला होता. त्यावेळी त्याला एक अनोळखी इसम भेटला. याने फिर्यादी ज्या ठिकाणी काम करतो त्या जागेच्या अनेक लोकांची नावे सांगून आपली ओळख पटवली आणि मालकाने बँकेत 50 हजार जमा केल्याचे सांगितले आहे, असं सांगून 50 हजार दिले आणि मोजण्यास सांगितले.
त्यानंतर त्याने 50 हजार घेतले आणि मोजले. त्यामुळे फिर्यादीची आरोपीवर अधिक विश्वास बसला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला सांगितले की, मालक आणखी 2 लाख आणणार आहे. हे 50 हजार घेऊन बँकेच्या रांगेत उभे रहा. कॅश काउंटरवर फिर्यादीचा नंबर येताच आरोपींनी फिर्यादीला बाहेर बोलावून मालक पैसे देण्यासाठी बाहेर आल्याचे सांगितले. फिर्यादी बाहेर जाताच कॅश काउंटरवर ठेवलेले ९८ हजारांची रोकड घेऊन आरोपी फरार झाला.
फिर्यादीला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. गुन्ह्याचं गांभीर्य पाहता वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शरद जाधव यांनी पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरू केला. दरम्यान, बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज तसंच गुढ विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी दहिसर येथे असल्याची माहिती मिळाली.
यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला दहिसर येथून अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव सैफुद्दीन उखाणे (47) असून आरोपीकडून 22 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपीवर मुंबई, ठाणे आणि गुजरातच्या विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 23 हून अधिक गुन्हे दाखल आहे.