भाजप आमदार जयकुमार गोरेंना मोठा दिलासा; जामीन मंजूर

भाजप आमदार जयकुमार गोरेंना मोठा दिलासा; जामीन मंजूर

सातारा न्यायालयात अर्ज केल्यानंतर गोरेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सातारा - खटाव तालुक्यातील मायणी येथील जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अटकेची तलवार होती. जयकुमार गोरे यांनी जामिनासाठी सातारा, मुंबई आणि दिल्ली येथील न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आधी कोर्टापुढे शरण या, मगच जामीनासाठी अर्ज करा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी सातारा न्यायालयात अर्ज केल्यानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जयकुमार गोरे यांच्यासह एकूण 6 जणांवर मायणी गावातील जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मायणीतील महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनंतर आमदार जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.

त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गोरे यांना वडूज कोर्टात शरण जा आणि त्यानंतर जामिनासाठी अर्ज दाखल करा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर काही कालावधीत आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज न्यायालयासमोर हजर राहून त्यानंतर सातारा न्यायालयात मायणी प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.

याबाबत शुक्रवारी उशिरा सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी या प्रकरणात गोरे यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणणे मांडल्याने न्यायालयाने मायणी जमीन खोटी कागदपत्र प्रकरणात जयकुमार गोरे यांना जामीन मंजूर केल्याने गोरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com