महेश महाले | नाशिक : एका टरबूज विक्रेत्याचा घरगुती कारणावरून त्याच्या भावाने कोयत्याने वार करून त्यांचा कान तोडून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहर वाहतूक पोलीस चौकीच्या समोर दिंडोरी रोडवरील निमानी बस स्थानकाच्या बाजूला घडली आहे. सोमनाथ आसाराम भोसले असं जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
भोसले निमानी बस स्थानकाच्या बाजूला टरबूज विक्रीचा व्यवसाय करतात. सकाळच्या दरम्यान सोमनाथ हे आपल्या दुकानावर टरबूज विक्री करत असताना त्यांचा सख्खा भाऊ चेतन भोसले आणि त्यांचे इतर चार-पाच साथीदार यांनी सोमनाथ यांना कोयत्याने मारहाण केली. यात सोमनाथ यांचा उजवा कान तुटून पडला आहे. त्यांचे वडील आसाराम भोसले हे देखील वाद सोडवायला गेले असता त्यांना देखील चोपरने वार करून जखमी केले.
यानंतर सोमनाथ व त्यांचे वडील या दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहे.