कल्याण-मुरबाड रस्त्यावरील खड्यांमुळे नागरिक  त्रस्त; नागरीकांसह रिक्षा चालकांचे बेमुदत उपोषण सुरु

कल्याण-मुरबाड रस्त्यावरील खड्यांमुळे नागरिक त्रस्त; नागरीकांसह रिक्षा चालकांचे बेमुदत उपोषण सुरु

रस्ता जोर्पयत नीट केला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही; प्रशासनाला इशारा

अमजद खान | कल्याण : कल्याण-मुरबाड रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर म्हारळ पाडा ते पाचवा मैल या दरम्यान रस्त्यावर खड्य़ांचे साम्राज्य आहे. त्याकडे महामार्ग व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. अखेरीच आज संतप्त नागरीक आणि रिक्षा चालकांनी आजपासून म्हारळ येथे रस्त्यालगतच बेमुदत उपोषण सुरु केले आहे. रस्ता जोर्पयत नीट केला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, या उपोषणाला शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी भेट दिली व त्यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आहे.

कल्याण-मुरबाड-नगर हा राष्ट्रीय महामार्ग कल्याण आणि नगरला जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. नगरमधील शेतमाल यामार्गे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो. तसेच काही अशी अन्य मालवाहतूकही या मार्गे केली जाते. त्यामुळे या मार्गावर प्रवासी भारमान जास्त आहे. माळशेज घाटात पावसाळी पर्यटनासाठी शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी लोक जातात. त्यामुळे पिकनिकला जणाऱ्यांसाठी देखील हाच मार्ग आहे. याच मार्गावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि कॉलेज देखील आहेत.

म्हारळ, वरप, कांबा या मार्गावरील ही गावे आहेत. या गावातील नागरीकांसाठी हाच एक मार्ग आहे. कल्याण बस डेपोतून अहमदनगर आणि मुरबाडकडे जाणाऱ्या बसेस चालविल्या जातात. खाजगी बसेसही याच मार्गे चालविल्या जातात. या रस्त्याचे काही ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यात पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. म्हारळ, वरप, कांबा या भागातील नागरीकांनी, रिक्षा चालकांनी, जागरुक कार्यकर्त्यांनी वारंवार या समस्येकडे लक्ष वेधून आंदोलन केले आहे. काही वेळा रास्ता रोकोही केला आहे. तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही. या रस्त्यावरील खड्य़ामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर सरकारला जाग येणार का? असा सवाल येथील संतप्त नागरिक आणि वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

म्हारळपाडा टेकडीवरुन वाहत येणारे पाणी थेट रस्त्यावर येते. पावसाचा जोर असल्यावर हे पाणी रस्त्याला ओलांडून जाते. त्यामुळे या भागात पावसामुळे रस्ता काही ठिकाणी वाहून गेला आहे. या भागातील नैसर्गिक नाले बुजविल गेले असल्याने ही समस्या उद्भवली आहे. रस्त्याच्या दुतर्फा नागरीकीकरण वाढत असताना नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंद केल्याने पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळयात पडलेले खड्डे, पाण्याची डबकी आणि चिखलातून प्रवास केला जात होता. काही ठिकाणी खडी टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून रोज सायंकाळी जोरदार पावसाच्या हजेरीमुळे ही खडी देखील वाहून गेली आहे. अपघात होऊ नये यासाठी कॉन्ट्रॅक्टदारने काही ठिकाणी रेडीयमचे खांब लावले होते. ते देखील वाहन चालकांनी पाडून मार्गक्रमण केल्याने रात्रीच्या वेळी याठिकाणी रेडीयम इंडिकेटरचाही पत्ता नाही.

Lokshahi
www.lokshahi.com