अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा; पोलिसांचा लाठीचार्ज

अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा; पोलिसांचा लाठीचार्ज

पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट

सूरज दहाट | अमरावती : स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक आज होत आहे. मात्र, या निवडणुकीला आज गालबोट लागले. अमरावती येथील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रावर दोन गटात मोठा राडा झाला. यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मतदान केंद्रावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

मतदान केंद्रात लॉबिंग होत असल्याच्या कारणावरून विकास पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार डॉ.दिनकरराव गायगोले यांचे बंधू रवींद्र गायगोले व प्रगती पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार हेमंत काळमेघ यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेल्याने दोघेही एक दुसऱ्याच्या अंगावर धावून गेले. या वादात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतल्याने मतदान केंद्र परिसरात गोंधळ उडाला.

वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार व अकोटचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांनीही या वादात उडी घेतली. त्यानंतर पोलिसांनी एकाला काठ्यांचा प्रसाद देत त्याला ताब्यात घेतले. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने गाडगे नगर पोलीसानी बंदोबस्त वाढवला. घटनास्थळी ठाणेदार आसाराम चोरमले यांनी धाव घेत ॲक्शन मोडवर येत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, डॉक्टर दिनकर गायगोले व पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यात वाद झाला. आमदार पंकज भोयर सुद्धा घटनास्थळी दिसून आले. शिवाय नरेशचंद्र ठाकरे यांचे चिरंजीव विक्रम ठाकरे हे ही घटनास्थळी पाहायला मिळाले. आमदार देवेंद्र भुयार हे मतदान केंद्राच्या आत असल्याने काहींनी आक्षेप नोंदवला, मात्र मी प्रतिनिधी असल्याने मी आतमध्ये होतो तर मला धक्काबुक्की झाली नाही, असं देवेंद्र भोयर यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com