भारीच की! बीडच्या महाविद्यालयाने केवळ 11 महिन्यातच उभारलं जंगल

भारीच की! बीडच्या महाविद्यालयाने केवळ 11 महिन्यातच उभारलं जंगल

राज्यभरातील महाविद्यालयात राबविला जाणार बीड पॅटर्न

विकास माने | बीड : एका महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष चळवळीसाठी हाती घेतलेल्या मोहिमेतून केवळ 11 महिन्यातच जंगल उभारले आहे. याची दखल खुद्द राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली असून महाविद्यालयास कौतुकाची थाप दिली आहे. आता हाच बीड पॅटर्न संपूर्ण राज्यातील महाविद्यालयात राबविण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

बीड शहरातील श्री बंकट स्वामी महाविद्यालयाने दंडकारण्य प्रकल्प यशस्वी करून दाखविला आहे. मागील अकरा महिन्यांमध्ये या प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची चांगली वाढ झाली. या यशस्वी प्रकल्पाची नोंद राजभवनाने घेतली असून राज्यातील सर्वच विद्यापीठांनी असा प्रकल्प राबवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहे. महाविद्यालय परिसरात दोन गुंठे क्षेत्रावर 48 प्रकारच्या 560 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने हे वृक्षारोपण करण्यात आलं आहे. आता केवळ 11 महिन्यातच परिसरात एक घनदाट दंडकारण्य निर्माण झाले आहे.

श्री बंकट स्वामी महाविद्यालयात हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर प्राचार्यांनी कुलपती घनवन योजना तयार करावी, असा प्रस्ताव राज्यपाल कार्यालयाकडे पाठवला. या प्रस्तावाचे नाव देखील याच महाविद्यालयाने सुचवले आहे. राज्यपालांकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आणि पाहता पाहता आता हाच पॅटर्न सबंध महाविद्यालयात राबविला जाणार आहे.

महाविद्यालयातील प्राचार्य आणि शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनी देखील यासाठी मोठी मेहनत घेतली होती. हीच वृक्ष चळवळ इतर ठिकाणी देखील राबविली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे.

या महाविद्यालयाने राबविलेल्या प्रकल्पाची चर्चा पंचक्रोशीत होतेय. त्यामुळे हे दंडकारण्य पाहण्यासाठी वन अधिकारी, विद्यार्थी, शेतकरी भेटी देत आहेत. केवळ महाविद्यालयात नाही तर इतर ठिकाणी देखील याचं अनुकरण झालं, तर निश्चितच वृक्ष चळवळीची मोठी मोहीम उभारली जाऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com