महाराष्ट्रात 35 हजार कोटींची 'हिंदुजा ग्रुप'ची गुंतवणूक तर दीड लाख रोजगार मिळणार

महाराष्ट्रात 35 हजार कोटींची 'हिंदुजा ग्रुप'ची गुंतवणूक तर दीड लाख रोजगार मिळणार

जी.पी.हिंदुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे केले कौतुक

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा हिंदुजा ग्रुपसोबत सामंजस्य करार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला आहे. यानुसार महाराष्ट्रात एकूण 12 क्षेत्रात ही गुंतवणूक हिंदुजा ग्रुप करणार आहे. यामध्ये 35 हजार कोटी गुंतवणूक करण्यात येणार असून दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. यावेळी जी.पी.हिंदुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुकही केले आहे.

उद्योगपती जी.पी.हिंदुजा म्हणाले की, महाराष्ट्रात ३५ हजार कोटी कमीत-कमी गुंतवत आहोत. आतापर्यंत आम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिले. मात्र, एकनाथ शिंदे वेगळे आहेत. यातील शासकीय अडथळे त्यांनी तात्काळ दूर केले. असे झाल्यास महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढेल. शिंदे हे बोलण्यात गुंतवत नाही थेट निर्णय घेतात, अशी स्तुती त्यांनी केली आहे.

तर, मुंबई, भंडारा येथे आरोग्याबाबत आम्ही गुंतवणूक करत आहोत. विविध उद्योग आहेत. यामुळे दीड ते दोन लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. दहा दिवसांपूर्वी आम्ही चर्चा केली आणि आता एमओयू (MOU) साईन केले आहे. इतक्या तातडीने पहिल्यांदाच एमओयू साईन झाले. खरचं यावरून शिंदेंना महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचं आहे असं दिसतयं, असे उद्योगपती अशोक हिंदुजा यांनी म्हंटले आहे.

काय आहे करार?

हिंदुजा ग्रुप महाराष्ट्रात एकूण 12 क्षेत्रात 35 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सायबर, मनोरंजन, नवीन टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग यात ही गुंतवणूक असणार आहे, अशी माहिती हिंदुजा समूहाचे मुख्य जी.पी. हिंदुजा यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात लंडनमध्ये हाऊस ऑफ लॉर्डमध्ये एक गुंतवणूक विषयक सेमिनार झाले होते. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्याला हिंदुजा समूहाने प्रतिसाद देत ही गुंतवणूक केली असल्याचे हिंदुजा समूहाचे जी पी हिंदुजा आणि अशोक हिंदुजा यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com