कांदिवली : घरातून ३ लाखांची चोरी; चोराला १२ तासांत पोलिसांनी केले जेरबंद
रिध्देश हातिम | मुंबई : कांदिवलीत घरातून ३ लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली. याची तक्रार समतानगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी आपली सूत्र फिरवत आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
कांदिवलीतील समतानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरातून ३ लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केलेली तक्रार नोंदवण्यात आली. गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि. संदिपान उबाळे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व गुप्त बातमीदारांना विश्वासात घेऊन सदर घटनेबाबत हकिकत सांगून अज्ञात चोरट्या इसमाचा शोध करण्यास सुरुवात केली.
शोध सुरु असताना एका गुप्त बातमीदाराने खात्रीलायक माहिती दिली कि, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे अभिलेखावरील घरफोडी करणारा आरोपी नामे सुशांत दिनेश खेडेकर उर्फ सुसू हा संशयास्पद फिरत होता. पोलिसांनी तात्काळ बोरीवली येथे रवाना होऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी देवीपाडा, बोरीवली पूर्व येथून सुशांत दिनेश खेडेकर हा दिसून आला.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यास आणून गुन्हयासंबंधाशी कौशल्यपूर्व विचारपूस केली असता त्याने गुन्हयाची कबूली दिली. अटक आरोपीचे नाव सुशांत दिनेश खेडेकर (वय २३) असून गुन्ह्यातील चोरीस गेलेले 100 टक्के मालमत्ता पोलिसांकडून जप्त करण्यात आले.