अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद? मुलीचा खून झाल्याचा भाजप खासदाराचा आरोप

अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद? मुलीचा खून झाल्याचा भाजप खासदाराचा आरोप

भाजप खासदाराच्या नव्या आरोपाने अमरावतीत खळबळ

अमरावती : कथित लव्ह जिहादचे प्रकरण खासदार नवनीत राणा यांच्याच अंगलट आले आहे. अशातच आता पुन्हा एकदा लव्ह जिहाद प्रकरणातून एका मुलीचा खून झाल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. अनिल बोंडे यांच्या नव्या आरोपाने खळबळ माजली आहे.

अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहाद या आंतरधर्मीय विवाहाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अनिल बोंडे यांनी पुन्हा एक खळबळजनक माहिती देत पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात पोटनी गावात एका मुलीला घरून दोनदा पळवून नेलं व तिचा १९ऑगस्ट रोजी गावातील विहिरीत मृतदेह आढळला. मात्र, पोलिसांनी अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप बोंडे यांनी केला.

वडिलांनी पुरावे देऊनही अमरावती ग्रामीण पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप बोंडे यांनी केला. त्यामुळे या नव्या आरोपाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून खरंच लव्ह जिहाद सारखे प्रकार घडत आहे का, याचा सखोल तपास आता पोलिसांनी करणे गरजेचे आहे.

दरम्यान, याआधीही अमरावती येथे कथित लव्ह जिहाद प्रकरणी तरुणी बेपत्ता होती. संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांनी अमरावती येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळही घातला होता. मात्र, तरुणीने मला कोणीही पळवुन नेलं नाही. मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे, असा धक्कादायक खुलासा पीडित तरुणीने माध्यमांशी बोलतांना केला. त्यामुळे विविध आरोप करणारे भाजप नेते व राणा दाम्पत्य या प्रकरणात तोंडघशी पडले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com