मुंबईकरांनो, आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे तिन्ही मार्गावर रेल्वे रॅकच्या देखभाल आणि इतर संबंधित कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीत रेल्वेची सेवा बंद राहणार आहेत. तर काही ठिकाणी विशेष रेल्वे सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे.
माटुंगा ते मुलुंड मार्गावर सकाळी 11 ते 3.55 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत स्लो ट्रॅकवरून सुटणाऱ्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील आणि 15 मिनिटे उशिरानं निश्चित स्थानकात पोहोचतील.ठाण्याहून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत स्लो ट्रॅकवरून सुटणाऱ्या लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकावर थांबतील.
मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वेवरील पनवेल - वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल - बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल - बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल येथून ठाण्याकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी - नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉकअसणार आहे. सांताक्रूझ - गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. याकालावधीत अप - डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ - गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.