पुण्यात म्हाडाची सहा हजार घरांच्या लॉटरीची घोषणा; जाणून घ्या महत्वाच्या तारखा

पुण्यात म्हाडाची सहा हजार घरांच्या लॉटरीची घोषणा; जाणून घ्या महत्वाच्या तारखा

नूतन सोडत प्रणालीनुसार नोंदणीकरण प्रक्रियेतच अर्जदार ठरणार पात्र

मुंबई : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५९९० सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांच्या हस्ते आज करण्यात आला.

नव्या प्रक्रियेनुसार नोंदणीकरणा दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार असून पुणे मंडळाच्या सदनिकांची संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता नेहरू मेमोरियल हॉल येथे काढण्यात येणार आहे.      

https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध  करून देण्यात आली आहे. तसेच येथे अ‍ॅप डाउनलोड करण्याची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, व्हिडीओस, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी माने यांनी केले आहे.      

पुणे मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या अ‍ॅपवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारी रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. तसेच ६ फेब्रुवारी, रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागद पत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या अ‍ॅपद्वारे पात्र ठरविले जातील व सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या  https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे.  

दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे ई-मेल द्वारे तसेच अ‍ॅपवर प्राप्त होणार आहे. नूतन सोडत संगणकीय सोडत प्रणालीचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी अर्जदारांना आपल्या सदनिकेचे तात्पुरते देकार पत्र पुढील दोन दिवसांतच ऑनलाईन अ‍ॅपमध्ये प्राप्त होणार आहे.  

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com