कुणाला जामीन मिळाला म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण काय?- उदय सामंत

कुणाला जामीन मिळाला म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण काय?- उदय सामंत

“एखाद्या न्यायालयात केस चालू असताना जामीन मिळाला असेल किंवा जामीन मिळाला नसेल तर त्यावर न्यायालयाच्या बाहेरच्या लोकांनी बोलणं योग्य आहे,
Published by :
Sagar Pradhan

लक्ष्मीकांत घोणसेपाटील|रत्नागिरी: संजय राऊतांच्या जामीन अर्जावर शिवसेनेच्या शिंदे गटाची नेमकी काय भूमिका ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी राऊतांना जामीन मिळाल्याने आमच्या अडचणी वाढतील असं कुणाला वाटत असेल तर त्यात तथ्य नाही, असं सामंत म्हणाले. तसेच कुणाला जामीन मिळाला म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी केला.

“एखाद्या न्यायालयात केस चालू असताना जामीन मिळाला असेल किंवा जामीन मिळाला नसेल तर त्यावर न्यायालयाच्या बाहेरच्या लोकांनी बोलणं योग्य आहे, असं मला वाटत नाही. न्यायालय हे दोन्ही बाजू ऐकून निर्णय देत असतं. संजय राऊत यांच्याशी संबंधित कोर्टाने दिलेल्या निकालाविषयी मला माहितीदेखील नाही”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

“न्यायालयाच्या बाहेर राहून एखाद्या निकालावर भाष्य करणं योग्य वाटत नाही. याशिवाय मी कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे या विषयावर बोलणं योग्य नाही”, असं मत त्यांनी मांडलं. “कुणाला जामीन मिळाला म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण काय? शेवटी आम्हीपण काम करतोय. आम्ही चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कोण जामीनावर सुटलं, कोण जामीनावर सुटलं नाही हा न्यायालयाचा भाग आहे. कुणी सुटल्यामुळे जर आम्ही अडचणीत येऊ असं कुणाला वाटत असेल तर त्यामध्ये काही तथ्य नाही”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com