नारळाची किंमत सव्वा लाख तर कोथिंबीर पेंडी साडे आठ हजार...!

नारळाची किंमत सव्वा लाख तर कोथिंबीर पेंडी साडे आठ हजार...!

सांगलीमधील वाळवा तालुक्यातील घटना

संजय देसाई | सांगली : एक लाखांचा नारळ आणि कोथिंबीरची पेंडी साडे आठ हजार रुपये, ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, वाळव्याच्या शिरगाव मध्ये एक लाख 25 हजारांना नारळ आणि साडे आठ हजार रुपयांना कोथिंबीरची पेंडी विकली गेली आहे. पारायण सोहळ्याचे निमित्ताने आयोजित महाप्रसादामध्ये शिल्लक राहिलेल्या साहित्यांची लिलाव करण्याच्या उपक्रमात हे दर मिळाले आहेत.

वाळवा तालुक्यातल्या शिरगाव या ठिकाणी दरवर्षी ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.सोहळ्याच्या समारोपाला दूध पुरण पोळीचा प्रसाद असतो. जवळपास पाच हजाराहुन अधिक भक्त प्रसादाचा अस्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात.

लोकवर्गणीतून हे सर्व पारायण सोहळा असो किंवा महाप्रसाद पार पाडला जातो. तर या ठिकाणी महाप्रसाद पार पडल्यानंतर त्यासाठी आणलेले पदार्थ व साहित्य शिल्लक राहिल्यास त्याची बोली लावण्याची प्रथा आहे. या लिलावातून मिळणाऱ्या पैशातून मंदिराचा विकास केला जातो.

यंदाही पारायण सोहळा आणि महाप्रसाद पार पडल्या आणि त्यानंतर उरलेल्या साहित्याचा लिलाव देखील.ज्यामध्ये शिल्लक राहिलेल्या एका नारळाला एक लाख 25 हजार 111 रुपये इतकी किंमत मिळाली. अरविंद पवार यांनी हा मानाचा नारळ बोलीतून खरेदी केला. तर कोथिंबीरच्या एका पेंडीला 8 हजार 501 दर मिळाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिल्लक असणाऱ्या प्रत्येक पदार्थांनी वस्तूला हजारो रुपयांची बोली लागली.

अगदी प्रसादासाठी वापरण्यात आलेले शिल्लक राहिलेले द्रोण पत्रावळी असतील किंवा स्वयंपाक करण्यासाठी आणलेला जळण आणि दुधावर आलेली साय देखील, हजारो रुपयांची बोली लावून श्रद्धेपोटी खरेदी करण्यात आले. सिध्देश्‍वर मंदिराचे प्रमुख गजानन पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत लिलाव प्रक्रीया झाली. यावेळी प्रत्येक घटकाच्या खरेदीसाठी कमालीची चढाओढ लागली होती.

Lokshahi
www.lokshahi.com