ठाण्यात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद
शुभम कोळी | ठाणे : स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधित केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. या कामांसाठी हा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती महानगरपालिकाच्या वतीने देण्यात आली आहे.